यहीं है जिंदगी ?


        आज आपण किती आनंदी आहोत यापेक्षा आपण किती यशस्वी आहोत याला महत्त्व दिले जाते. एखाद्या स्पर्धेत मिळालेल्या अनुभवापेक्षा प्राप्त झालेल्या क्रमांकाचे मोल जास्त ठरते. पण ठिक आहे कारण जन्माला येण्याकरीता देखील आपण लाखो शुक्राणूसह स्पर्धा केली असतेच.
        परंतु जन्माला येताच आपले स्वतःचे आपलेपण दडून जाते आणि आपण आईप्रमाणे, वडिलांप्रमाणे किंवा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीप्रमाणे आहोत असे अंदाज बांधले जातात. कुटुंबातील सदस्य त्यांची राहिलेली स्वप्ने आपण पूर्ण करू अशी इच्छा करतात. आता कुठे आपल्या पायात चालायचे बळ आले असते तो पर्यंत A for apple आणि B for ball त्याच्या जोडीला one, two, three, four...ची शिकवणी चालू होते. आपली मातृभाषा ही फक्त भाषा आहे पण English is knowledge अस म्हणून आपल्या वयाच्या अवघ्या 6व्या, 7व्या वर्षी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातले जाते. त्या क्षणापासून आपल्या आयुष्यातील 'प्रथम' क्रमांकाचे महत्त्व वाढते. आणि आपल्याला क्लासेस नावाच्या घटकाची ओळख होते. मग आपण त्या क्रमांकासाठी अभ्यास करू लागतो. दहावी उत्तीर्ण होऊन आता कुठे आपण स्वतःला शोधू लागतो तो पर्यंत आपल्याला बारावीचे शिखर दाखविले जाते. आणि पुन्हा तोच क्रमांकाकरीता अभ्यास, तिच स्पर्धा पुन्हा सुरू होते. या वेळी फक्त शाळेचे काॅलेजमध्ये रुपांतर झाले असते.
        बारावी उत्तीर्ण होईपर्यंत आपण मोठे झालो आहोत, काही वर्षांनी आपल्यावर कुटुंबाची जबाबदारी येणार याची जाणीव करून दिली जाते. व नकळत आपल्याला पैशांचे महत्त्व कळते. मग आपण पुढील 4 ते 5 वर्षे नोकरी मिळावी म्हणून आपण ज्या विषयात हुशार आहोत किंवा ज्या क्षेत्रात नोकर्‍या जास्त आहेत अशा क्षेत्रात पदवी प्राप्त करतो. हे पारपडेपर्यंत आपण आयुष्यातील वयवर्ष 23 गाठले असते. सर्वांच्या अपेक्षांप्रमाणे वयाच्या 24साव्या वर्षी आपल्या हातात नोकरी असते. मग पुन्हा एकदा आपण स्वतःची आवड आणि  स्वतःला शोधू लागतो ...
         तो पर्यंत... 'आपण वयात आलो आपले लग्न कधी होणार?' कुटुंबाआधी समाज हा प्रश्न उपस्थित करतो. लग्नानंतर आपण कुटुंब प्रमुख म्हणून सर्व जबाबदारी पारपाडण्यास सज्ज होतो. मग मनाच्या कोपऱ्यात कुठे तरी दडलेली ती आवड, ते स्वप्न आपली मुले पुर्ण करतील अशी इच्छा व्यक्त करतो. आणि त्याकरिता त्यांची शिकवणी चालू करतो. कुटुंबास कशाची ही कमतरता भासू नये म्हणून वयाच्या 60व्या वर्षापर्यंत काम करतो व साठलेली जमापुंजी आणि मुलांच्या सहवासात आपले आयुष्य घालवतो.
          ज्याप्रमाणे एखाद्या पदार्थास साचेबंद आकृतीत ठेवल्यावर तो त्या साच्याचा आकार घेतो त्याप्रमाणे आपण सुद्धा इतर लोक किंवा परीस्थिती जसे आपल्या घडवतील तसे घडत जातो. आणि या स्पर्धा, प्रवासात आपण आपली आवड, आपली स्वप्ने पूर्ण करू शकत नाही. म्हणून जीवन असे जगा की आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात जेव्हा आपण म्हणू "यही है ज़िन्दगी" तेव्हा वाक्याच्या शेवटी प्रश्न चिन्ह नसून चेहर्‍यावर येणाऱ्या स्मित हास्यसह पूर्णविराम लागेल.
                                             
                                           - निशांत देवेकर

Also follow me at -
https://www.instagram.com/nishant_devekar/

Comments

Post a Comment