चादर...


       एका कापड निर्मिती कारखान्यात लख्ख पांढर्‍या चादरी तयार होत होत्या, शंभर-एक मशिन्स न थांबता घड्याळाच्या काट्यावर आपले काम करत होत्या. एक धागा दुसर्‍या धाग्यासोबत विनला जात होता. धागा बरोबर विनला जावा म्हणून मशिनचा प्रत्येक पार्ट चोखपणे आपले काम बजावत होता. प्रत्येक मशिनमागे एक व्यक्ती तैनात होता तो चादरीकरीता लागणारा कच्चा माल मशिनमध्ये पसरवून ठेवत होता. सगळे काही ठीक चालू होते.
           परंतु तेथील एका मशिनमध्ये पसरवल्या गेलेल्या कच्च्या मालात काळा धागा उपस्थित होता हे त्या व्यक्तीच्या लक्षात आले नाही. त्यामुळे पुढील काळात तो काळा धागा मशिनच्या सहाय्याने इतर धाग्यांसह सहजच गुंतला गेला. अखेर तयार झालेल्या त्या पांढर्‍या शुभ्र चादरीत ती काळी रेषा उठून दिसत होती. त्यामुळे त्या चादरीस वेगळे ठेवण्यात आले. खरेदीदाराने त्या चादरीची किंमत कमी दिली. अर्थात त्या चादरीचे महत्त्व कमी झाले.
          आपण जर नीट पाहीले तर; तो कारखाना, ती मशिन म्हणजेच आपले आयुष्य आहे आणि ती पांढरी शुभ्र चादर म्हणजे 'नाती'. तैनात असणारा व्यक्ती म्हणजे आपले सर्वांसह संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न. पसरवण्यात येणारा कच्चा माल ते पांढरे धागे म्हणजे घडत असणारे प्रसंग. एकामेकामध्ये विनला जाणारा धागा म्हणजे संबंध आणि तो नकळत विनला गेलेला काळा धागा म्हणजे 'गैरसमज'.
         ज्याप्रमाणे चादरीत नकळत काळा धागा विनला गेला त्याचप्रमाणे नात्याच्या या बंधनात नकळत गैरसमज निर्माण होतात. व त्या नात्याला अवघडलेले स्वरुप प्राप्त होत. त्या नात्याची किंमत, महत्त्व कमी होते. म्हणून कोणत्याही नात्यात गैरसमज निर्माण होऊ नयेत याची काळजी घ्या. कारण गैरसमज असणारं 'नातं' आणि ती वेगळी केली गेलेली 'चादर' यांना कधीच आयुष्यात चांगली किंमत प्राप्त होत नाही!
     
                                              - निशांत देवेकर

Also follow me at -
https://www.instagram.com/nishant_devekar/

Comments

Post a Comment